माझे, आमचे, सर्वांचे राजन खान
ज्यांनी आपली संपूर्ण हयात लिहिण्यात, वाचण्यात, बोलण्यात, उपक्रम घेण्यात घालवली त्यांच्याबद्दल माझ्यासारखा काहीच न लिहिणारा माणूस लिहितोय... १/८/२०१६ रोजी राजन खान आमच्या कॉलेजवर व्याख्यान देण्यासाठी आले होते. ते नाव प्रथमच ऐकत होतो. पण जसंजसं व्याख्यान पुढे सरकत होतं, कळत होतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून काय जाणार नाही. माझं वाचन त्या काळात कमी होतं, पण चळवळीतले काही मित्र होते. पुरोगामी विचार, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्यता याबद्दल जागरूक होतो. पण सर जे बोलत होते ते काहीतरी वेगळंच होतं. अगोदर कधी न ऐकलेलं असं. ते म्हणाले मी 'माणूस' आहे. मी हसलो. पुढे ते 'माणूस'बद्दल जे सांगत राहिले, मग मात्र हरवून गेलो. ते करुणेचं, समाज शांत, सुखी, भेदरहित करण्याचं बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून अक्षर मानव बद्दल माहिती मिळाली. मनापासून आवडलं ते काम. पुणे कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. पुढे अक्षर मानवमध्ये सक्रिय सहभाग नोंदवू लागलो.